कोल्हापूर जिल्हयाच्या पूर्वेस शिरोळ तालुका दक्षिणोत्तर ५० कि.मी. अंतरावरती स्थित आहे. शिरोळ तालुका पंचगंगा, कृष्णा, दुधगंगा व वारणा नद्यांच्या पंचक्रोशित विखुरलेला आहे. तालुक्याचे भौगोलिक क्षेत्रफळ ५०,२९२.४४ हेक्टर आहे पैकी बागायती क्षेत्र २४,४९८ हेक्टर आहे. शिरोळ तालुका कृषी, सहकार व औद्योगिक क्षेत्रात अग्रेसर आहे.
सन २०११ च्या जनगणने नुसार शिरोळ तालुक्याची लोकसंख्या ३,९१,०१५ इतकी आहे. त्यापैकी ग्रामीण लोकसंख्या ३,२०,१३३ इतकी आहे तर शहरी लोकसंख्या ७०,८८२ इतकी आहे. तालुक्यामध्ये ५२ महसूली गावे असून ५२ ग्रामपंचायती व ३ नगरपरिषदा अस्तित्वात आहेत.
श्री क्षेत्र नृसिंहवाडी हे पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य दत्तक्षेत्र तालुक्यामध्ये आहे. येथे श्री दत्त दर्शनासाठी महाराष्ट्राबरोबरच गोवा, कर्नाटक, आंध्रप्रदेश, गुजरात या राज्यामधून भाविक मोठ्या प्रमाणावर येतात. येथे दर १२ वर्षांनी कन्यागत महापर्वकाळ सोहळा संपन्न होतो. तालुक्यातील खिद्रापूर येथे यादवकालीन कोपेश्वर मंदीर आहे. गणेशवाडी येथे प्राचीन गणेश मंदीरआहे. तर तेरवाड येथे पुण्यश्लोक मुक्तेश्वर महाराजांची समाधी आहे. नांदणी येथे अतिशय क्षेत्र आहे.
तालुक्यामध्ये ऊस, सोयबीन, ज्वारी, भुईमुग व भाजीपाला पिके प्राधान्याने घेतली जातात. शिरोळ येथे सहकारी तत्वावरील एक साखर कारखाना व टाकळीवाडी येथे एक खाजगी साखर कारखाना असे दोन साखर कारखाने आहेत. तालुक्यामध्ये पार्वती औद्योगिक वसाहत, यड्राव, ल.क.आकिवाटे औद्योगिक वसाहत, जयसिंगपूर, व शाहू औद्योगिक वसाहत, आगर अशा तीन औद्योगिक वसाहती आहेत.
शिरोळ पंचायत समिती तालुक्यातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी कार्यरत आहे. पंचायत समितीचे संकेतस्थळ कार्यान्वीत करण्यामागे डिजिटल इंडियाची संकल्पना सत्यात उतरवने, तालुक्याच्या ग्रामीण भागातील जनतेला शासनाच्या विविध योजनांची माहिती, त्यासाठीचे पात्रता निकष व लागणारी कागदपत्रे यांची माहिती घरबसल्या उपलब्ध करून देणे हा मुख्य उद्देष आहे. याशिवाय पंचायत समितीच्या माध्यमातून घेण्यात आलेले निर्णय लोकांपर्यंत पोहोचवणे हा देखील उद्देश आहे.
संकेतस्थळावर जनतेच्या सुचना, अभिप्राय देखील अपेक्षित आहेत. ज्याद्वारे पंचायत समितीच्या योजना आखणी व अंमलबजावणी मध्ये ते सहाय्य्यभुत ठरतील व जनसहभाग युक्त विकासप्रक्रिया साध्य करता येईल.